मुंबई, -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या कार्यक्रमात बोलताना काँग्रेसवर खोटे आरोप केले. कर्नाटक आणि राजस्थान सरकारने कर्जाचा डोंगर उभा केल्याचा आरोप मोदींनी केला. परंतू, वास्तविक पाहता कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येऊन अवघे दोन महिनेच झाले आहेत. त्याआधी कर्नाटकात भाजपचे सरकार होते. कर्नाटकातील ४० टक्के कमीशनवाल्या भाजप सरकारनेच कर्नाटकवर कर्जाचा डोंगर उभा करुन ठेवला,असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यातील कार्यक्रमात बोलताना कर्नाटक राज्य सरकारवरील वाढत्या कर्जाचाही उल्लेख केला. कर्नाटक सरकारने राज्याला कर्जबाजारी केले असून त्यांच्याकडे विकासासाठी आता पैसे नाहीत असाही आरोप मोदी यांनी भाषणात केला होता. हा आरोप खोडून काढताना पटोले यांनी मोदी यांनीच केवळ ९ वर्षात देशावर १०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर करुन ठेवल्याचाही सनसनाटी आरोप केला.
मोदींच्या आधी ६७ वर्षांत देशातील सर्व सरकारांनी मिळून अवघे ५५ लाख कोटी रुपयांचे कर्ज केले होते. म्हणजे मोदींनी ९ वर्षातच कर्जाचा डोंगर तिप्पट उभा केला. एवढे मोठे कर्ज करुनही देशातील गरिबांची संख्या कमी झाली नाही,उलट वाढली.रोजगार निर्माण झाले नाहीत, महागाई कमी करता आली नाही. ९ वर्षात गरीब आणखी गरीब झाला, तर मूठभर लोक मात्र अब्जाधीश झाले. मोदी सरकारमध्ये केवळ मूठभर ‘मित्रों’चा फायदा होत असून गरीबांचे मात्र रक्त शोषून घेतले जात आहे. महाराष्ट्रातील भाजपप्रणित सरकारनेही कर्जाचा मोठा डोंगर करून ठेवला आहे, याचीही माहिती पंतप्रधानांनी घ्यायला हवी होती. देशाच्या पंतप्रधानांनी बोलताना अभ्यासपूर्ण आणि माहिती घेऊन बोलावे. केवळ राजकीय आरोप करण्यासाठी फेकाफेकी करू नये, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.परंतु ज्या व्यक्तीने सर्वोच्च पदावर बसून देशात केवळ द्वेषाची बिजे पेरली, हिंदू-मुस्लीम वादाला खतपाणी घातले असा भारत लोकमान्य टिळक यांनाही आवडला नसता, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
लोकमान्य टिळक यांनी हिंदू-मुस्लिम एकतेसाठी मोठे प्रयत्न केले आहेत. लोकमान्यांनी जुलमी ब्रिटीश सत्तेविरोधात जनतेला एकत्र आणण्याचे काम केले आणि स्वतंत्र भारतात मात्र जनतेला एकमेकांविरोधात लढवण्याचे पाप भाजप आणि मोदी करत आहेत. लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीच्या अगदी उलट मोदी आणि त्यांच्या पक्षाची विचारसरणी आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
समृद्धीवरील मृत्यूंची जबाबदारी कोणाची ?
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा मोठा गाजावाजा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. समृद्धी महामार्ग बांधताना तांत्रिकदृष्ट्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्याचे दिसत नाही. समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी किती असुरक्षित आहे हे मागील सहा-सात महिन्यात दिसले आहे.पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात पाउल ठेवण्याच्या आधीच शहापूरजवळ या महामार्गाचे काम सुरु असताना अपघात होऊन १८ गरीब मजुरांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता भाजप सरकार समृद्धी महामार्गावर आणखी किती बळी घेणार आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
समृद्धी महामार्गाचे ऑडिट करुन सर्व त्रुटी दूर करणे गरजेचे आहे पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. महामार्गाचे आणि त्याच्या उद्घाटनचे श्रेय घेता, मग या महामार्गावरील नाहक बळींची जबाबदारी कोण घेणार? असाही सवाल पटोले यांनी सरकाराला विचारला.
………………………………..(समाप्त)………………
Average Rating