मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विद्यार्थ्यांसाठी घोषणा…..
मुंबई,-समाजातील प्रत्येक घटकाला कौशल्य विकासाची संधी मिळावी या उद्देशाने राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाद्वारे राज्यातील सर्व आयटीआय संस्थांमध्ये ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण कार्यक्रम’सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा सोमवारी येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.
साहित्यकार तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण जडणघडणीत आणि परिवर्तनात आपल्या साहित्यातून अमूल्य योगदान दिलेले आहे.संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांची ओळख सर्वश्रुत असून, त्यांनी लिहिलेल्या कथा-कादंबऱ्या ही साहित्य क्षेत्रात समाज संक्रमणाची पहिली किमया ठरली आहे.त्यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट पासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमामार्फत तयार झालेल्या अभ्याक्रमातून बांबूपासून शिल्प व वस्तू बनवण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना मिळेल तसेच अर्थार्जनासाठी या कौशल्याचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन सुद्धा मिळेल.या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आणि स्वयं रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी शासन कार्यरत आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोकनायक आणि क्रांतिकारी वादळ अशी ख्याती असणारे साहित्यकार अण्णा भाऊ साठे हे आपल्या सर्वांचेच प्रेरणास्थान आहेत.त्यांच्या साहित्याचा वसा घेऊन आपण सर्वच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत आहोत.त्यांच्या जयंतीनिमित्त सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा. तरुणांना कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन आपल्या राज्याचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी आम्ही तत्पर आहोत,असेही मंत्री लोढा यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी कौशल्य,रोजगार,उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे प्रधान सचिव आशिष सिंह आणि राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी उपस्थित होते.
…………………….(समाप्त)………..
Average Rating