आमदार सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी
मुंबई- राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑनलाईन काम करण्यासाठी उत्तम दर्जा व कार्यक्षमता असलेले मोबाईल उपलब्ध करून देण्याबाबतच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची तत्काळ अंमलबजावणी करावी तसेच ‘पोषण ट्रॅकर ऍप’ मध्ये मराठी भाषेत माहिती संकलित करण्याची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली.
त्यावर,याबाबत केंद्र सरकारच्या पोर्टलवर निविदा प्रकाशित केली असून पुढील प्रक्रिया शासनाच्या खरेदी धोरणानुसार पूर्ण करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी आपल्या लेखी उत्तरात दिली.
आमदार पाटील यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधले होते.राज्यात एक लाखापेक्षा अधिक अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत.राज्य शासनाकडून अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन कामासाठी देण्यात आलेले मोबाईल फोन सदोष व कालबाह्य झाले आहेत.याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चार महिन्यात नवीन मोबाईल देण्याबाबत सरकारने कोणती कार्यवाही केली असा सवालही आमदार पाटील यांनी केला.तसेच महिला बालविकास विभागाकडून मराठीमध्ये पोषण ट्रॅक्टर भरण्यासाठी ॲप विकसित करून दिले गेलेले नाही हे खरे आहे का? असा प्रश्नही विचारला.पोषण ट्रॅकर ऍपच्या माध्यमातून लाखो बालके व माता यांची अद्ययावत आकडेवारी नोंदवून शासनाला धोरण ठरवताना त्याचा फायदा होईल, यासाठी मराठी मधून हे ॲप्लिकेशन असावे अशीही मागणी आमदार पाटील यांनी केली.
यावर दिलेल्या लेखी उत्तरात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोबाईल उपलब्ध करून देण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले. त्याचबरोबर केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकां साठी मराठीसह इतर स्थानिक भाषांमध्येही माहिती भरण्याची सुविधा पोषण ट्रॅकर एप्लीकेशन मध्ये उपलब्ध करून दिली आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच अंगणवाडी सेविकांना मोबाईल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या जीईएम पोर्टलवर मोबाईल फोन खरेदी संदर्भात निविदा प्रकाशित करण्यात आली असून त्या पुढील प्रक्रिया शासनाच्या खरेदी धोरणानुसार पूर्ण करण्यात येणार असल्याचेही माहिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
……………………….(समाप्त)………………
Average Rating