काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांची विधानसभेत मागणी
मुंबई-महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामाच्या निमित्ताने मुंबईत आलेले गिरणी कामगार हे मुंबईचे खरे निर्माते असून त्यांच्या हक्काच्या घराचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने कालमर्यादा निश्चित करावी आणि सकारात्मक रित्या हा प्रश्न सोडवावा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलताना केले.
थोरात म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात हा प्रश्न प्रामुख्याने समोर आला होता. महसूल मंत्री या नात्याने हा प्रश्न हाताळायची जबाबदारी माझ्याकडे होती, आम्ही या प्रश्नात खूप काम केले, पुढे गेलो आणि अनेक प्रश्न मार्गी लावले. गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे केवळ राजकारण म्हणून बघू नये.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामा धंद्याच्या निमित्ताने ही लोक मुंबईत आली, स्थिरस्थावर झाली, त्यांनी मुंबई उभी करण्यात हातभार लावला. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी कालमर्यादा निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
त्यावर बोलताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले की,हा प्रश्न महत्त्वाचा असून तो सोडविण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे निश्चित कालमर्यादेतला कार्यक्रम आखला जाईल, व या संदर्भातील बैठक घेऊ.त्या बैठकीलाही थोरात यांना बोलावून घेतले जाईल आणि हा प्रश्न मार्गी लावू, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
………. समाप्त……
Average Rating