मुंबई,- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे.परंतु निवडणूक आयोगाने अजित पवार आणि शरद पवार गटाला प्रतिज्ञापत्र देण्यास अद्याप सांगितलेले नाही.तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गटांनी पक्षावर दावा केल्यामुळे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नोटीस काढली आहे.
आयोगाने शरद पवार यांच्या गटाला नोटीस पाठवून म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार यांना नोटीस बजावताच उपमुख्यमंत्री अजित पवारही कामाला लागले आहेत. अजित पवार यांनी थेट प्रतिज्ञापत्रं जमा करण्यासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे आता शरद पवार गट काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांना बैठक घेऊन यासंदर्भात आदेशच दिले आहेत. राष्ट्रवादी पक्षाचा ताबा आणि चिन्ह मिळवण्यासाठी अजित पवार यांनी आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांना प्रतिज्ञापत्र तयार करण्याचे टार्गेटच दिले आहे.प्रत्येक आमदारांनी १० हजार आणि जिल्हाध्यक्षांनी ५ हजार शपथपत्र भरून देण्याचं आदेशच पवार यांनी दिले आहेत.जास्तीत जास्त शपथपत्र भरून देण्यासाठी अजित पवार गटाकडून आवाहन करण्यात आलं आहे, अशी माहिती शुक्रवारी येथे एका सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्यानंतर अजित पवार गटाकडून कागदपत्रांची जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे.आजपर्यंत तरी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र मागितलेले नाहीत.परंतु जे शिवसेनेत घडले तेच आता राष्ट्रवादीत देखील होऊ शकते, असे या सूत्रांचे म्हणणे आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट निर्माण झाले. या दोन्ही गटाने पक्ष चिन्ह आणि पक्षावर दावा सांगितला होता.त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला संख्याबळ सादर करण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं. त्यानुसार दोन्ही गटाने प्रतिज्ञापत्रं सादर केली. मात्र निवडणूक आयोगाने सुनावणी करून शिंदे गटाला शिवसेनेचं चिन्ह आणि पक्षाचा ताबा दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. जे शिंदे आणि ठाकरे गटात झालं, त्याचीच पुनरावृत्ती आता राष्ट्रवादीत होताना दिसत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा ताबा कुणाकडे जातो हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
……………………………………(समाप्त)……………………..
Average Rating