काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा
मुंबई, _आमदारांना विकास निधी देताना काँग्रेस पक्षाच्या आमदारांवर अन्याय झालेला असून विकास निधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जास्त प्रमाणात वाटण्यात आला आहे. तर काँग्रेसच्या आमदारांना अत्यंत कमी निधी देण्यात आला आहे. काही आमदारांना निधीचे वाटपही झाले नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आमदारांना विकास निधी देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तरीही विकास निधी नाही दिला तर मात्र काँग्रेस न्यायालयात धाव घेईल, असा इशारा काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
पटोले व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात भेट घेऊन विकास निधीबाबात चर्चा केली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की,निधी वाटपात असमानता झाली असून काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघासाठी विकास निधी मिळाला पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मंजूर केलेल्या विकास कामांना सरकारने स्थगिती दिलेली आहे ती स्थगितीही उठवावी अशी मागणी करण्यात आली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन विकास निधीवर निर्णय घेऊ असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. काँग्रेस पक्ष दोन दिवस वाट पाहील.दोन दिवसातही निधी मिळाला नाही तर कोर्टात धाव घेऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
….पालकमंत्र्याचे कार्यालय हटवा…..
मुंबई महानगरपालिकेमध्ये पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कार्यालय स्थापन केले असून पालकमंत्र्यांचे हे कार्यालय तात्काळ बंद केले पाहिजे. मुंबई महानगर पालिकेत पालकमंत्र्यांचे कार्यालय सुरु करुन भाजपाने नवीन परंपरा सुरु केली आहे ती चुकीची आहे.महानगर पालिका स्वायत्त संस्था आहे, तेथे पालकमंत्र्यांचे कार्यालय सुरु करून भाजपा राजकारण करत आहे, हे थांबवले पाहिजे, अशी मागणीही काँग्रेस पक्षाने केली असल्याचे पटोले यांनी सांगितले.
………………………………………(समाप्त)……………………
Average Rating