शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ‘एफ दक्षिण’ विभागातील नागरिकांशी साधला सुसंवाद

Read Time:4 Minute, 49 Second

महिलांसाठी सार्वजनिक सुविधा केंद्र सुरू करणार

– पालकमंत्री दीपक केसरकर.

मुंबई, दि. १२ – राज्यात नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शासन काम करीत आहे. याच उद्देशाने मुंबई शहरात देखील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आयोजित करून नागरिकांच्या समस्या सोडविल्या जात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ‘एफ दक्षिण’ विभागातील महिलांसाठी सुविधा केंद्र उभारून तेथे त्यांना आठवड्यातून एकदा वस्तू विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागातील रहिवाशांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी मंत्री श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या समस्या तातडीने सोडविणे शक्य आहे त्या सोडविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. खासदार राहुल शेवाळे, आमदार ॲड.मनीषा कायंदे, आमदार कालिदास कोळंबकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त महेश पाटील, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व संबंधित शासकीय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            या सुसंवाद कार्यक्रमात विभागातील सुमारे ६० रहिवाश्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने परिसरात पोलिसांची गस्त वाढविणे, पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे, महिला बचत गटांसाठी विक्री केंद्र उपलब्ध करून देणे, त्यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करणे, सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविणे, महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना सुविधा उपलब्ध करणे, नालेसफाई, स्वच्छता आदी विषयांचा समावेश होता.

            मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, मुंबई शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या अधिक प्रमाणात जाणवतात. त्यांना एकटेपणा जाणवू नये यासाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार असून येत्या महिनाभरात त्याची कार्यवाही सुरू होईल. तेथे जाण्या-येण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. महिला बचत गटांना त्यांचे उत्पादन विक्रीसाठी आठवड्यातून एक दिवस जागा उपलब्ध करून देण्यात यावी, याचप्रमाणे कमी रहदारीच्या रस्त्यावर सायंकाळनंतर खाद्यपदार्थांच्या गाड्या लावण्याची (फूड कोर्ट) व्यवस्था करावी, सार्वजनिक शौचालये वाढवावीत, आपला दवाखानाच्या माध्यमातून रुग्णांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. टाटा रुग्णालयात देशभरातून रुग्ण येतात, त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी महानगरपालिकेने सुविधा उपलब्ध करून देण्याची आणि त्यांच्या जाण्या-येण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वाहन व्यवस्था करण्याची सूचनाही केली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *