मुंबई,_मुंबईतील वांद्रे पूर्व येथील शिवसेना शाखेतील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेवर हातोडा मारण्याचे आदेश ‘वर्षा’हून देण्यात आले होते, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी येथे केला.
राऊत यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांचे थेट नाव घेतले असून बाळासाहेब ठाकरे यांना सरकारने राष्ट्रपुरुषांचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आता कायद्यानुसार महापालिका अभियंत्यावर कारवाई करणार का? असा सवाल करत बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, असेही राऊत यांनी निक्षून बजावले.
वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने काल, सोमवारी कारवाई केली.या कारवाईवेळी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोवर हातोडा मारण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी या प्रकरणी त्यांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीकाही केली.
मुख्यमंत्र्यांचे दिवटे चिरंजीव यांच्याकडे कोणीतरी तक्रार घेऊन गेले आणि त्यांनी हातोडा मारण्याचे आदेश दिले. ज्या बाळासाहेबांच्या नावाने हे लोक रोजीरोटी खात आहेत, कोट्यवधीची माया कमवत आहेत , त्या बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडे मारताना यांना लाज वाटत नाही. वर्षा बंगल्यावरून आदेश देणाऱ्याने निर्लज्जपणाचा कळस गाठला असून हा नीचपणा आहे. ज्या बाळासाहेबांच्या नावावर जगलात, वाढलात, फुटलात त्याच नावावर राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळवले, त्या फोटोवर हातोडे मारण्याचे आदेश देता? असा संतप्त सवालही राऊत यांनी विचारला.
आमदार अनिल परब त्या भागातील विभागप्रमुख आहेत. शिवसैनिकां सोबत त्यांनी महापालिका कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चामध्ये लोकांच्या भावना संतप्त आणि तीव्र होत्या. ४०-५० वर्षांची शिवसेनेची जुनी शाखा तोडली. बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडे मारले गेले, यावेळी राज्य सरकार आणि महापालिका अधिकाऱ्यांना लाज वाटली नाही, अशी विचारणाही राऊत यांनी केली.
फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल आणि त्या कारणासाठी आमच्या आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली जात असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने राजीनामा द्यावा, अशी मागणीही राऊत यांनी केली.मोर्चा काढणारे आम्ही कोण आहोत, हा काय अतिरेक्यांचा मोर्चा आहे का? असा सवालही त्यांनी केला. शिवसेनेचा मोर्चा म्हणजे मुंबईतील नागरिकांची भावना आहेत.कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती त्यांच्यामुळे कोसळली आहे, अशी टीका त्यांनी केली.मिस्टर फडणवीस तुम्ही गृहमंत्री असाल तर आम्ही शिवसैनिक आहोत, असा इशाराही राऊत यांनी दिला.
पंतप्रधान मोदी यांच्या आजच्या भाषणावरही राऊत यांनी टीका केली. पंतप्रधान मोदी हे स्वत: पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांबाबत बोलत नाही. अनेक मंत्री, आमदारांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देण्यात आले. पण, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.आमच्या पक्षात या आणि भ्रष्टाचार करा असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मोदींनी देशातील भ्रष्टाचारावर बोलावे.राहुल गांधी आणि विरोधकांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी तुम्ही संसद चालू दिली नाही.मोदी अजून मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल, महागाईवर एक चकार शब्दही बोलले नाहीत याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले.
……………………………………..(समाप्त)…………………………
Average Rating