मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई, _राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणातून सामाजिक उन्नतीकडे जाण्यावर भर दिला होता. आजच्या लोकार्पण सोहळ्यातून आपण त्याच दिशेने प्रयत्न करीत आहोत. मुंबई शहरामध्ये आपण २५० विद्यार्थिनी क्षमतेचे वसतिगृहाचे लोकार्पण करीत असून या वसतिगृहाला माता रमाई यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे केली.
सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाच्या लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे आज पार पडले.या कार्यक्रमास पर्यटन आणि कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते चेंबुर येथील १ हजार मुला-मुलींची विभागीय स्तरावरील वसतिगृहापैकी २५० मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटनही करण्यात आले. तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मंगरुळपीर जि. वाशिम व बार्टी अंतर्गत येरवडा संकुल पुणे येथील संघ लोकसेवा आयोगाचे निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. तसेच समान संधी केंद्र उपक्रमाच्या मोबाईल ॲपचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांचा जयंती दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.मी त्यांना प्रथम अभिवादन करतो. शाहू महाराजांना मोठी आव्हाने असताना समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. खेडोपाडी शाळा सुरू केल्या.आणि वसतिगृह संकल्पना आणली त्यामुळे वसतिगृह संकल्पनेचे जनक म्हणून संबोधले जाते.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेच्या अर्थसहाय्यात शासनाने वाढ केली आहे. राज्यातील अनुसुचित जाती घटकातील सनदी अधिकारी तयार व्हावेत यासाठी बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण दिले जाते. या संस्थांमधून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारमार्फत होत आहे. राज्य शासन अनुसुचित जाती, जमाती व बहूजन वर्गाच्या कल्याणासाठी विविध योजना राबवित आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविली आहे. सामाजिक न्याय, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, इतर मागास विभाग, शालेय शिक्षण विभाग, कौशल्य विकास आदी विभागांमार्फत विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नमूद केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईतील एसआरए सारख्या इतरही रखडलेल्या सर्व प्रकल्पांमुळे नागरिकांना त्रास होतो. असे सर्व प्रकल्प सरकारच्या माध्यमातून संबंधित संस्थांना सोबत घेऊन पूर्ण करण्यात येणार आहेत. चेंबूर परिसरातील प्रलंबित असलेले असे सर्व प्रकल्पही मार्गी लावले जातील, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी केले तर आभार समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मानले.
वसतिगृह व मोबाईल ॲप विषयी माहिती
आज मुंबई या शहरामध्ये २५० क्षमतेचे वसतिगृहाचे सुरू करण्यात आले. नजीकच्या काळात आणखी ७५० विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह सहा महिन्यांत सूरू करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात १३०० मूले व ३५० मुलींसाठी वसतिगृहाची उपलब्धता होणार आहे.चेंबूर येथे उभारण्यात येत असलेले हे वसतिगृह १००० क्षमतेचे असून त्याचे बांधकाम BOT तत्वावर झालेले आहे. या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे भोजन, शैक्षणिक सुविधा, सुरक्षित निवास याबरोबरच शैक्षणिक/इंटरनेट संगणक सुविधा, ग्रंथालय सुविधा, करमणूकीच्या सुविधा उपलब्ध आहेत.
वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहामुळे १०० मुलींच्या निवासाची व शिक्षणाची व्यवस्था ग्रामीण भागामध्ये उपलब्ध होणार आहे.
समान संधी केंद्र उपक्रमाच्या मोबाईल ॲप च्या माध्यमातून राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये अनुसुचित जाती जमाती, विजाभज, इमाव या सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना असलेल्या शैक्षणिक सवलती यांची माहिती मिळणार असून रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता, व्यवसायिकता कौशल्य प्रशिक्षण या सर्व बाबींचे सर्वसमावेशक मार्गदर्शनही मिळणार आहे.
………………………………………..(समाप्त)…………………….
Average Rating