मुंबई, दि.२३_आज पाटणा मध्ये विरोधी पक्षांची बैठक होत असून त्याला देशातून विरोधी पक्ष नेते एकत्र येणार आहेत. महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरे, संजय राऊत तर राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार असले तरी महाराष्ट्रा मधल्या च विरोधी पक्षाची तारांबळ उडाली असून महा विकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचं स्थान हे राष्ट्रवादी पक्षाने हिसकावून घेतलं आहे, अशा खरमरीत शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे एका पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला.
त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांची हि गत आहे, तर दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना त्यांचे असलेले मानाचे पद सोडावंसं वाटतं.तिसरीकडे,काँग्रेस पक्षाने आपल्याच प्रदेशाध्यक्षाच्या विरोधात बंड पुकारलं आहे.नाना पटोले यांची कधीही हकालपट्टी होऊ शकते.
महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांची अवस्था सध्याच्या घडीला अत्यंत बिकट असून आम्हाला याच आश्चर्य वाटतंय की जी लोक स्वतःच घर सांभाळू शकत नाहीत आज तीच लोक देश जिंकायच्या गोष्टी करतात, असा टोलाही सामंत यांनी लगावला.
आमचा या तिन्ही पक्षांना एक प्रश्न आहे की तुम्हाला नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मान्य आहेत का? नितीश कुमार हे भाजपच्या समर्थनाने बिहारचे मुख्यमंत्री झाले.आणि भाजपला दगा देऊन लालू प्रसाद यादव यांच्या पक्षासोबत जाऊन मुख्यमंत्री पदी बसले.नितीश कुमार यांच्यामध्ये आज कोणत्याच प्रकारची राजकीय निष्ठा, इमानदारी उरलेली नाही, असा आरोपही सामंत यांनी केला.
आजच्या घडीला भारतामध्ये राहुल गांधी,ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि शरद पवार यांच्यासारखे खूप पंतप्रधान पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत. हे सगळे विरोधी पक्ष राष्ट्रीय पातळीवर जनतेला आपण एकत्र असल्याचं भासवत असले तरी आतमधून ते एकमेकांचे विरोधी आहेत. त्यांचा डोळा फक्त पंतप्रधानांच्या खुर्चीवर असून काहीही करून मोदींना हरवायचा हेच त्यांचं एकमेव लक्ष्य आहे.एनडीए चा प्रभाव करणे हेच यांचं ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या सगळ्या विरोधी पक्षांमध्ये पारिवारिक पक्षच जास्त असून या पक्षांना देशातल्या लोकशाही पेक्षा आपला परिवार वाचवायचा आहे.हि लोक देशाला आपला परिवार कधीच मानत नाहीत.यांचं सगळं लक्ष आपल्या परिवारावरच आहे.महाराष्ट्रामधून गेलेल्या उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे,काँग्रेस मधून गेल्यानं राहुल गांधी आणि राष्ट्रवादी मधून गेल्यानं सुप्रिया सुळे यांचं राजकीय भविष्य सुरक्षित करायचं असल्याकडे ही सामंत यांनी लक्ष वेधले.
उद्धव ठाकरे यांची लाचारी बघण्यासारखी आहे.बाळासाहेब ठाकरे यांनी या देशाला हिंदुत्व शिकवलं आणि राष्ट्रवाद दिला.आज त्यांचेच पुत्र त्याच लालू प्रसाद यादव यांना समर्थन द्यायला पाटण्याला गेले आहेत. ज्या लालू प्रसाद यादव यांनी बाळासाहेबांच्या विरुद्ध अपशब्द काढले होते. हिंदुत्वाचा विरोध केला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पाटण्यामध्ये होणारी बैठक ही हिंदुत्वाचा पराभव कसा करायचा यावर विचारमंथन करण्यासाठी घेण्यात येत आहे. या बैठकीला हिंदुत्व विरोधी पक्ष आहेत आणि त्यांच्याच पंगतीला बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करून त्यांचे पुत्र आणि नातू पाटण्याला गेले आहेत.ही या स्वातंत्र्य भारतामधील वैचारिक गद्दारी असून,आम्ही उद्धव ठाकरे यांना विचारू इच्छितो की आपण पाटण्याला जाऊन हिंदुत्व बद्दलचे कोणते विचार मांडणार आहात.तुम्हाला पंतप्रधान म्हणून राहुल गांधी हवेत? शरद पवार हवेत? ममता बॅनर्जी हव्या आहेत? की नितीश कुमार पाहिजेत? हे आधी स्पष्ट करा.आजच्या दिवशी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्याशी युती करून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावर वार केला.आज बाळासाहेब ठाकरे जर जिवंत असते त्यांनी उद्धव ठाकरे यांना हे पाप करण्याची परवानगी अजिबात दिली नसती, अशा शब्दात त्यांनी उद्धव यांना ठणकावले.
“आम्ही हिंदुत्व अजिबात सोडलेलं नाही” असं महाराष्ट्रामध्ये सांगायचं आणि पाटण्याला जाऊन हिंदुत्व संपवण्याचा कटात सहभागी व्हायचं हा उद्धव ठाकरे यांचा दुटप्पीपण जनतेला आणि सैनिकांना कळायलाच हवा.महाराष्ट्रामध्ये आज सेना भाजप च सरकार आहे.आमची विचारधारा एकच आहे.आमचं लक्ष्य एकच आहे.पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश खूप चांगली प्रगती करत आहे.विकासाचं नवीन पर्व भारतात सुरु झालेलं आहे. धर्मनिपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर होणारे अत्याचार बऱ्याच प्रमाणात कमी झाले असून परिवारवादी पक्षांचा पराभव होत आहे.एक वेगळी राजकीय क्रांती या देशात सुरु झाल्याचा दावा ही सामंत यांनी केला.
महाराष्ट्र राज्याला राहुल गांधी,नितीश कुमार,ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते पंतप्रधान म्हणून अजिबात मान्य नाहीत.आम्ही या विरोधी पक्षांच्या बैठकीचा निषेध करतो, आणि पाटण्याला गेलेल्या हिंदुत्वाच्या गद्दारांना आम्ही ताकीद देतो की हिंदुत्व संपवणायचा कट जो रचला जात आहे तो आम्ही हाणून पाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही उद्योगमंत्री सामंत यांनी दिला.
…………………………….(समाप्त)………….
Average Rating