शरद पवारांचे भाकीत….
मुंबई- ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे उद्याच्या निवडणुकीत पुन्हा त्यांच्या हातात सत्ता आली तर चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही, असे भाकीत वर्तवितानाच, म्हणून पक्ष प्रयत्न करतोय, पुढाकार घेतोय की देशातील लोकशाहीवर विश्वास असणार्या सर्व पक्षांना एकत्र करून देशातील सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी जी लोकशाहीची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर कुणी हल्ला करत असेल, तर त्या गोष्टी या देशात होऊ द्यायच्या नाहीत, लोक एकत्र करायचे, शक्ती उभी करायची आणि चुकीच्या, सांप्रदायिक जातीयवादी, माणसा माणसा मध्ये विद्वेष वाढवणार्या ज्याप्रवृत्ती आहेत त्यांच्या हातामध्ये सत्ता जाणार नाही याची काळजी घ्यायची असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी बुधवारी येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रौप्यमहोत्सव षण्मुखानंद सभागृहात पार पडला.यावेळी पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला.
देशातील सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी जी लोकशाहीची व्यवस्था आहे.त्या व्यवस्थेवर कुणी हल्ला करत असेल, तर त्या गोष्टी या देशात होऊ द्यायच्या नाहीत. लोक एकत्र करायचे, शक्ती उभी करण्याचे काम होत असल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
आज शेतकरी अस्वस्थ, दुखावलेला आहे. शेती मालाच्या किमती योग्य पध्दतीने मिळत नाही. कांदा, कापूस असो आज खान्देश मराठवाडामध्ये शेतकरी कापूस साठवून ठेवत आहे. ही परिस्थिती याअगोदर नव्हती. संपूर्ण अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. मोदींनी तीन वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन दुप्पट करु सांगितले.पण केले नाही, मात्र दुसरीकडे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या आहेत. आज गेल्या पाच महिन्यात राज्यात ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्वाधिक आत्महत्या होतात ही अवस्था राज्यात आहे याबद्दल तीव्र नाराजीही पवार यांनी व्यक्त केली.
राज्यकर्त्यांची कायदा व सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी असते मात्र महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या. शांतताप्रिय अशी ओळख राज्याची असताना सत्ताधारी सत्ता नाही त्याठिकाणी राग काढण्याचा प्रकार करत आहेत. कायदा व सुव्यवस्था ठीक नसेल तर दंगली स्वरुपात त्याची किंमत मोजावी लागते, असा इशारा देतानाच, लहान घटकांना संरक्षण द्यायचे असते. परंतु आज महिलांची काय परिस्थिती आहे. २३ जानेवारी २३ मे २०२३ पर्यंत ३१५२ मुली व महिला गायब आहेत भगिनींचे संरक्षण करण्यात सरकार काय करतेय असा संतप्त सवालही पवार यांनी कोणाचेही नाव न घेता केला.
राज्यकर्त्यांना एक खबरदारी घ्यावी लागते.परंतु ती घेतली जात नाहीय. मणीपूरमध्ये दंगली होत आहेत. जे घडतंय त्याकडे केंद्र सरकार ज्याप्रकारे बघतेय त्यावरून आम्ही नागरीक आहोत की नाही अशी चिंता त्यांना वाटत असेल.म्यानमारच्या सीमेवर मणीपूर आहे. चीनच्या सीमेवर काही भाग येतो आहे. त्याठिकाणी अशी परिस्थिती असेल तर काय उपयोग आहे. मात्र त्याकडे लक्ष द्यायला वेळ केंद्र सरकारला वेळ नाही याबाबतही तीव्रनाराजी पवार यांनी व्यक्त केली.
प्रत्येकाने पदांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे.संसदेत कार्यक्रम झाला त्यात राष्ट्रपतींना निमंत्रण दिले गेले नाही.निमंत्रण दिले नसेल तर साधी गोष्ट आहे का? उद्घाटन कुणी केले मोदी यांनी. राष्ट्रपतींना बोलावले असते तर प्रोटोकॉल पाळला गेला असता आणि राष्ट्रपतींचे नाव आले असते म्हणून त्यांना न बोलवण्याचे कारण समोर आले आहे.माझं नाव त्याठिकाणी असलं पाहिजे. दुसरं कुणाचं चालणार नाही याच्याशिवाय दुसरं कारण नाही असा उपरोधिक टोलाही पवार यांनी पंतप्रधानांना लगावला. त्याचवेळी,
आजचे राज्यकर्ते सर्व संस्थाची इज्जत राखायची नाही ही भूमिका घेऊन काम करतात असा आरोपही पवार यांनी केंद्र सरकारवर केला..
याच व्यासपीठावरून २४ व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. महाराष्ट्र शरद पवारांच्या का उभा राहिला हे आपल्याला कळले असेल. राज्याचा असा कोणताही कानाकोपरा नाही तिथे पवार यांचे नाव नाही. जिथे निवडणूक लढलो नाही तिथेही पवारांचेच नाव आहे. त्यांच्याच रुपाने विचारांची शिदोरी आपल्यासोबत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
आज देशात इव्हेंटचेच राज्य सुरू असून कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट केला जात आहेत. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली जात आहे. कोणीही कितीही दडपशाही केली तरी शिंदे आणि त्यांच्या आमदारांना लोक गद्दारच म्हणत आहेत. पन्नास खोके म्हटले तर आपसूकच तोंडातून एकदम ओके निघते असा दावाही पाटील यांनी केला.
आज राज्यभरात दंगली घडत आहे. दंगलीचा पॅटर्न बघितला तर लक्षात येईल की जिथे भाजप शिंदे गटाची ताकद नाही तिथे या दंगली घडत आहे. मला सरकारमधील मंत्र्यांना सांगायचे आहे की तुम्ही काहीही करा पण महाराष्ट्रात हा प्रकार थांबवा असे आवाहनही पाटील यांनी केले.
भाजपने ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाची फसवणूक केली. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाविरोधात कोर्टात कोण गेले आहे याची माहिती आपण घ्यावी… त्यांचे धागेदोरे नागपूरच्या कोणत्या नेत्यापर्यंत आहेत. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की मराठा आरक्षणाच्या विरोधात नेमकं कोण आहे असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.
येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्षाच्या जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येतील यासाठी आपण सर्वजण आज एकजुटीने आणि एक दिलाने काम करण्याचा संकल्प करूया.येणारा काळ हा मोठा संघर्षाचा आहे.निवडणूक कधी होईल सांगता येत नाही.पण आपण ग्राऊंडवर तयार रहायला हवे असे आवाहनही पाटील यांनी केले.
राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्याचे आभार मानतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी निष्ठेने, मेहनतीने दिलेले काम पूर्ण करेन असा विश्वास व्यक्त केला.
या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पक्षाध्यक्ष खा.शरद पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री हसन मुश्रीफ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी मंत्री एकनाथ खडसे, खा.फौजिया खान, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री धनंजय मुंडे, खा. श्रीनिवास पाटील, खा. डॉ. अमोल कोल्हे, खा. वंदना चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस नरेंद्र मेहता,क्लाईड क्रास्टो, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री बाळासाहेब पाटील,माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, मुंबई कार्याध्यक्षा राखी जाधव, कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,आदींसह आजी माजी आमदार, खासदार व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……………………………(समाप्त)………….
Average Rating