अजित पवारांची थेट मागणी…
मुंबई, _आपण इतकी वर्षे राजकीय पदांवर काम केलेले असल्यामुळे आता
मला विरोधी पक्षनेते पदात फारसा इंटरेस्ट नाही. वरिष्ठांनी मला सांगितले होते, एक वर्ष विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळा, आता वर्ष झाले आहे. मला पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ वा वर्धापनदिन षण्मुखानंद हॉल येथे साजरा करण्यात आलेल्या व्यासपीठावरून बोलताना केली. त्यांनी अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे सर्वच उपस्थित नेते बुचकळ्यात पडले. मात्र उपस्थित पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी याचे टाळ्यांच्या गजरात भव्य स्वागत केले.
पवार म्हणाले, सरकार बदलल्यानंतर आमदारांनी आग्रह केला आणि त्यांनी सह्या केल्या, वरिष्ठांनीही सांगितले. त्यामुळे वर्षभरापासून विरोधी पक्षनेतेपद सांभाळले. आता काहींचे म्हणणे आहे की, मी कडक वागत नाही. मग काय आता मी सत्ताधाऱ्यांची गचांडी धरू का? अशी विचारणा करीत,आता बस झाले….. मला या जबाबदारीतून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या. मी कशा पद्धतीने पक्ष चालवतो ते बघा. अशा खरमरीत शब्दात त्यांनी उपस्थित पक्षाध्यक्ष खा. शरद पवार, कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, तसेच अन्य नेत्यांना सुनावले.
अर्थात हा अधिकार नेते मंडळींचा आहे, पण माझी इच्छा आहे. बाकीचे वेगवेगळी इच्छा प्रदर्शित करतात. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी पार पाडली. संघटनेत कोणतेही पद द्या, त्या पदाला न्यायच देईन.मला विरोधी पक्षनेतेपदात विशेष रस नव्हता. मात्र आमदारांचा आग्रह आणि वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळे मी ते पद स्वीकारले, हेही सांगण्यास ते विसरले नाहीत.
पवार म्हणाले, मंत्रीपद हवे असेल तर स्वतःच्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणले पाहिजेत. युवक सेलमध्ये ३५ ते ४० वय झाले तरी पदाधिकारी कार्यरत आहेत.पक्षाच्या विविध सेलमध्ये भाकरी फिरविण्याची गरज असल्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
……………………………..(समाप्त)…………
.
Average Rating