मुंबई,_पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना केंद्रबिंदू मानून अनेक योजना राबविल्या आहेत. तळागाळातील महिलांचा आर्थिक विकास हेच पक्षाचे ध्येय असून सहकार क्षेत्रात महिलांचा थेट सहभाग वाढावा त्यांना सहकारातून समृद्धीचा, प्रगतीचा थेट लाभ मिळावा यासाठी आजचे प्रशिक्षण शिबिर महत्वाचे ठरेल. सहकारातूनच महिलांचा उद्धार होईल असा ठाम विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.
भाजप महिला मोर्चाच्या वतीने सहकारी संस्थांचे प्रशिक्षण शिबिर दादर येथे पार पडले. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड.आशिष शेलार, सहकार मंत्री अतुल सावे, विधान परिषदेतील आमदार प्रवीण दरेकर, चित्रा वाघ यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले,महाराष्ट्र हे सहकारी चळवळीचे मोठे क्षेत्र आहे. येणाऱ्या काळात महिलांच्या मदतीने सहकारी चळवळ बळकट केली जाईल.भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सहकाराच्या माध्यमातून स्त्रियांमध्ये आर्थिक भान आणण्याचे काम केले जात आहे. सहकारातूनच महिलांचे प्रश्न सोडवणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘देना बँक’ आहेत; ‘लेना बँक’ नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून तुम्हाला हवं ते मागून घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना केले.
देशाला महासत्ता बनवण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. काँग्रेसच्या काळात महिला सक्षमीकरण झाले नाही. कर्नाटकात काँग्रेसने अभ्यासक्रमातून स्वातंत्रवीर सावरकरांच्या विषयीचा अभ्यासक्रम वगळला आहे.गोहत्या बंदीचा कायदा रद्द करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पंज्याला दिलेले एक मत किती घातक ठरू शकते याची प्रचिती येतेय असेही बावनकुळे यांनी नमूद केले. २०४५ पर्यंत देशाला आत्मनिर्भर करायचे आहे. यासाठी नरेंद्र मोदींनाच पुन्हा पंतप्रधान करण्याचे आवाहनही बावनकुळे यांनी यावेळी केले.
विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत. अनेकांना ताकद देण्याचे काम सहकारातून झाले आहे. महिलांचा सहकार क्षेत्रात सहभाग वाढावा याकरिता हे शिबिर महत्वपूर्ण ठरणार आहे. कर्तुत्वान महिला पुढे आल्या पाहिजेत. त्याच सहकारातून समाजाला ताकद देण्याचे काम करतील असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.
येणाऱ्या काळात महिलांच्या पाच हजार सहकारी संस्थांचे जाळे उभारण्याचा मानस दरेकर यांनी यावेळी बोलून दाखविला. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सहकारी क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देवून राज्यात पक्षाच्या वतीने महिला सहकारी बँक उभारणार असल्याचेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.
……………………………(समाप्त)………..
Average Rating