मुंबई, _आज राज्याच्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
नवीन निवडणूक सर्वेक्षणात लोकांच्या खऱ्या भावना नाहीत…
न्यूज एरिना इंडियाने केलेल्या निवडणूक सर्वेक्षणात महाराष्ट्रातील मतदारांची खरी भावना दिसून येत नाही, असे स्पष्ट मतही तपासे यांनी व्यक्त केले.
भाजपनेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षांतर घडवून आणले आणि महाविकास आघाडी सरकार पाडले हे राज्यातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच नव्हे, तर राज्यातील आणि राष्ट्रीय निवडणुकांमध्येही भाजपला धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार वाट पाहत आहेत असा दावाही तपासे यांनी केला.
भाजपच्या अंतर्गत पाहणीतही महाराष्ट्रातील ईडी सरकारच्या कामचुकारपणाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असून ईडी सरकारच्या गोंधळी कारभाराने प्रशासन ठप्प झाले आहे. त्यामुळेच कल्याणकारी राज्याची संकल्पना केवळ कागदावरच असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
नुकत्याच झालेल्या इतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये जनतेने भाजपला साफ नाकारले गेले आहे.परंतु भाजप महाराष्ट्राप्रमाणेच पक्षांतरासारखे अन्यायकारक मार्ग वापरून पुन्हा सत्तेवर आल्याकडेही तपासे यांनी लक्ष वेधले.
………………………………………(समाप्त)……………………
Average Rating