निवडणुकांच्या राजकारणापेक्षा देश हिताला प्राधान्य द्यावे………!

Read Time:6 Minute, 31 Second

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई,_देशात विविध पक्ष कार्यरत आहे. प्रत्येक पक्षाचे विधायक विविध राज्यांतील विधानसभांमध्ये आहेत. तरी निवडणुकांच्या राजकारणापेक्षा देशाचे हित, सार्वभौमत्वाला प्रत्येक विधायकाने प्राधान्य दिले पाहिजे,असे आवाहन करतानाच, त्यामुळेच लोकशाही सक्षम होऊन संपूर्ण भारत विकसित राष्ट्र होईल,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मधील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथील जास्मिन सभागृहात ‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत 2023’ चे आयोजन करण्यात आले. या संमेलनाचा समारोपीय कार्यक्रम आज पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,राज्यसभेचे उपसभापती हरिवंश,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे,गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यु. टी खादर,लोकसभेचे माजी अध्यक्ष मीरा कुमार,शिवराज पाटील तसेच विश्वनाथ कराड,सी.पी जोशी,सेलम,सतीश महाना आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय विधायक संमेलन भारत २०२३ च्या समारोपीय कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, की संपूर्ण भारतातील विधायक एकच ठिकाणी आले आहे. महाराष्ट्रात या संमेलनाची सुरुवात होणे,ही राज्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.कायदेमंडळात जनता आपल्याला निवडून देते.तेथे आल्यानंतर राज्याच्या विकासाचे काम आपल्या हातून होणे आवश्यक आहे.देशात लोकशाही जिवंत राहिली पाहिजे.जरी विधायक वेगवेगळ्या पक्षांचे असले तरी त्यांचे अंतिम ध्येय राज्याचा, देशाचा विकास हेच उद्दिष्ट असले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी ठामपणे नमूद केले.

राष्ट्रीय विधायक संमेलन लोकशाहीला समृद्ध करणारे

देशात पहिल्यांदाच सर्व विधायक एकाच ठिकाणी एकत्र आले आहेत. राष्ट्रीय विधायक संमेलनाच्या आयोजनामुळे ही संधी उपलब्ध झाली आहे.अशा प्रकारच्या संमेलनांच्या आयोजनांमुळे देशात लोकशाही समृद्ध व सक्षम होईल.त्यामुळे हे संमेलन निश्चितच लोकशाहीला समृद्ध करणारे ठरल्याचा विश्वास राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी संमेलनाच्या निरोपाच्या भाषणात बोलताना व्यक्त केला.

कायदे मंडळाच्या कार्यवाहीत डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत राज्यपाल बैस म्हणाले,की कायदे मंडळाचे कामकाज पेपरलेस झाले पाहिजे.सध्या बऱ्याच विधानसभांमध्ये अर्थसंकल्पीय कामकाज पेपरलेस झाले आहे.देशात नवीन निवडून आलेल्या विधायकाला किमान तीन महिने प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.त्यामुळे कायदे मंडळाची संपूर्ण कार्यवाही त्याला माहिती होईल.विधानसभांमध्ये पारित होणारे विधेयके, कायदे यामुळे समाजावर दूरगामी परिणाम होतात. त्यामुळे विधेयक विधानसभेत विस्तृत चर्चा करूनच पारित झाले पाहिजे. तसेच विधानसभांच्या कामकाजांचे दिवसही निश्चित असावेत,याची आवश्यकताही त्यांनी बोलून दाखवली.

देशातील विधायक एकत्र येवून त्यांचे अनुभव,संसदीय आयुधांचा प्रभावी उपयोग आदी माहितीचे आदान प्रदान झाले.हे सशक्त लोकशाहीचे लक्षण असल्याचे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी यावेळी विचार व्यक्त केले. त्यांनी देशापुढील आव्हाने लक्षात घेऊन संसदीय कामकाजात बदल करण्याचे प्रतिपादन केले.गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुसऱ्या विधायक संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी गोव्याला मिळाल्याबद्दलही आभार मानले.

दरम्यान,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुढील आयोजन गोवा राज्यात होणार असल्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना राजदंड देण्यात आला.तिसऱ्या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी कर्नाटक राज्याने घेतल्यामुळे कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यु.टी.खादर यांचा सत्कारही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीचा घंटानाद करण्यात येवून दीप प्रज्वलन करण्यात आले.आभार प्रदर्शन राहुल कराड यांनी केले.कार्यक्रमाला विविध विधानसभांचे अध्यक्ष, सभापती, उपसभापती, उपाध्यक्ष व देशातून आलेले विधायक उपस्थित होते.

…………………………………………(समाप्त)…………

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *