एसटी’चे आधुनिकीकरण करून सक्षम करणार……!

Read Time:6 Minute, 3 Second

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही……

मुंबई_राज्य शासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी, एसटीच्या पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ही निर्णय घेण्यात येत असून प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी एसटीचे आधुनिकीकरण करून या लोक वाहिनीला सक्षम करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे दिली.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार भरत गोगावले,‘एसटी’चे सदिच्छादूत तथा अभिनेते मकरंद अनासपुरे, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया,‘एसटी’चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने,परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एसटीचे अमृत महोत्सवी वर्ष व देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष हा दुग्ध शर्करा योग आहे.एसटीचा ७५ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास झाला असून ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे.एसटी महामंडळाने ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे काम करावे. एसटीची सेवा गुणवत्तापूर्वक व लोकाभिमुख असली पाहिजे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व महिलांना ५० टक्के प्रवास सवलत अशा योजनांना प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले,सरकार हे लोकांच्या हिताचे निर्णय घेणारे असावे, कायदा पण लोकांच्या हिताचा असावा. सरकारने मागील काळात लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीसाठी शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.राज्यात मेट्रो प्रकल्प,रस्ते निर्मिती आदी पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. सार्वजनिक वाहतुकीला सक्षम करणे गरजेचे आहे.त्यासाठी विविध पर्याय शासनामार्फत विकसित करण्यात येत आहे.आषाढी वारीसाठी महामंडळाने पर्याप्त बसेसची व्यवस्था केलेली आहे. राज्यातील एसटी बस स्थानकांमध्ये काँक्रिटीकरण पूर्ण करून बसपोर्ट ही संकल्पना राबविण्यात यावी.त्यासाठी पहिल्या टप्प्यात २५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. एसटीच्या जमिनीचे मूल्यवर्धन करून त्यावर महामंडळाने उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

                                                           प्रवासी हे एसटीसाठी सर्वस्व असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचे काम शासन करीत आहे.नवीन इलेक्ट्रिक बसेस,वातानुकूलित बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येत आहे.  महामंडळाच्या ताफ्यात लवकरच ७ हजार बसेस येणार आहेत.तसेच बस स्थानकांवर जमिन उपलब्धतेनुसार मराठी चित्रपटांसाठी मिनी थिएटर ही नवीन संकल्पना राबविण्यात येईल.शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक आहे.एसटी बसेस, बस स्थानक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे ते अहमदनगर या पहिल्या बसचे वाहक स्व.केवट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘अमृत महोत्सव महाराष्ट्राच्या लोकवाहिनीचा’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच २५ वर्ष सतत विना अपघात सेवा देणाऱ्या पाच चालकांचा सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहादा, कराड, बीड, अंबड, जामनेर, चोपडा, राळेगाव,सोयगाव व दिग्रस आगारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.एसटीच्या विविध योजना व माहिती देणाऱ्या फिरत्या प्रदर्शन विश्वरथचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

………………………………….(समाप्त)………………….

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *