मुंबई,-पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी येथे प्रदेश भाजपने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे.भाजपा – शिवसेना युतीने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.यावेळी ‘’महाविजय अभियान २४’’चे प्रदेश संयोजक आ.श्रीकांत भारतीय, महाजनसंपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक आ.प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी,विक्रांत पाटील,मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आदी यावेळी उपस्थित होते.
बावनकुळे यांनी सांगितले की,भाजपने नियुक्त केलेले निवडणूक प्रमुख भाजपा बरोबरच शिवसेनेच्या उमेदवारांनाही सहकार्य करणार आहेत.आगामी सर्व निवडणुका युतीत लढविणार असल्याने आमचे निवडणूक प्रमुख हे शिवसेनेसाठीही काम करणार आहेत.
मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे सध्या सुरु असलेल्या महाजनसंपर्क अभियानात नांदेड येथे १० जूनला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे.राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचीही राज्यात सभा होणार आहे.या अभियानात मोदी सरकारची कामगिरी सामान्य माणसापर्यंत पोहचविली जाणार आहे. या अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. या अभियानात घरोघरी जाऊन मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिकाही वितरित केली जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून ३ कोटी कुटुंबांपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत. याच अभियानात टिफिन बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नागपूर येथे व आपण अक्कलकोट येथे टिफिन बैठकीला उपस्थित होतो, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आ. राहुल कुल,पुण्यासाठी मुरलीधर मोहोळ,मुंबई उत्तरसाठी आ.योगेश सागर, मावळ साठी आ. प्रशांत ठाकूर आदींची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले.
Average Rating