कचरामुक्त मुंबईसाठी सरकारचे नवे पाऊल……..! आता आठ तासात कचरा उचलला जाणार….……?

Read Time:6 Minute, 49 Second

मुंबई, _आंतराराष्ट्रीय शहर अशी ख्याती असलेल्या मुंबईला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सरकारने नवे पाऊल उचलले असून आता मुंबईकरांना शहरातही कचऱ्याची तक्रार व्हॉटस्अप वरून करता येणार आहे.शहरात कुठेही कचरा साचला असल्यास किंवा डेब्रिज पडले असल्याचे आढळल्यास नागरिकांना त्याची तक्रार व्हॉटस्अप वर करता येणार आहे. या तक्ररीवर त्वरित कारवाई केली जाणार आहे.

नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देणाऱ्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’चा (८१६९६८१६९७ ) शुभारंभ बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. प्रभावीपणे या यंत्रणेचा वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला बंदरे विकास आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक तयार करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून ८१६९६८१६९७ या व्हॉटस्अप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन’ वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येणार आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिजबाबत तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासांत त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

या प्रणालीसाठी महानगरपालिकेने ३५० कनिष्ठ अवेक्षक (ज्युनिअर ओव्हरसिअर) यांची नेमणूक केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने करावा, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नमूद केले. नुकतेच भारतातील जपानचे राजदूत यांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी देखील बदलेल्या मुंबईचे कौतुक केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मुंबईतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून त्या माध्यमातून खड्डेमुक्त मुंबई संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. मुंबईत सुशोभिकरणाचे १ हजार १५० प्रकल्प सुरू असून त्याचे दृश्यस्वरुपात बदल दिसत आहेत. शहरात रोषणाई करण्यात आली असून समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईत १७० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. कोळीवाड्यांचा विकास, प्रदूषणमुक्त मुंबईला चालना देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण……..

मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याचे सांगत पुनर्विकासाची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. म्हाडा, एमएमआरडीए, सिडको, मुंबई महानगर पालिका, महाप्रित यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येतील,असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी स्पष्ट केले.

   'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन' सुविधा

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना थेट नोंदवता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अॕप हेल्पलाइन’ कार्यान्वित झाली आहे. नागरिकांना ८१६९६८१६९७ या हेल्पलाईन क्रमांकावर घनकचरा तसेच बांधकाम राडारोडा (डेब्रिज) विषयक तक्रारी नोंदविता येतील. महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी कचऱ्याशी संबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.

घनकचरा आणि डेब्रिज वगळता इतर तक्रारी, सूचना या हेल्पलाइनमध्ये नोंदवता येणार नाहीत, तसेच हेल्पलाईन व्हॉटस्ॲप स्वरुपातील असल्याने त्यावर बोलण्याची/संभाषणाची सुविधा नसेल. या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रार, सूचना नोंदवण्यासाठी सुविधा मिळणार आहे. दररोज वॉर्ड अधिकारी या तक्रारींवर संनियंत्रण करतील. दर आठवड्याला आयुक्त तक्रार निराकरणाचा आढावा घेतील.
………………………………….(समाप्त)…………………………….

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *