काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप…..
मुंबई,दि.९(अनंत नलावडे)-राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे पंतप्रधानपद मिळाले नाही हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत बालीश व हास्यास्पद असून पक्षात नेहमीच सर्वांना संधी दिली जाते.शरद पवारांनाही काँग्रेसने आमदार,खासदार,मुख्यमंत्री, लोकसभा विरोधी पक्षनेता,केंद्रीय कृषीमंत्री, संरक्षणमंत्री,अशा विविध पदांची जबाबदारी दिली.पण त्याच पवारांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची बदनामी करून त्यांचा पक्ष फोडण्याचे पाप नरेंद्र मोदी यांनीच केले, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचा समाचार घेताना पटोले म्हणाले की, मोदींच्या भाजपने कायमच पवार यांच्यावर खोटे नाटे आरोप करून त्यांची बदनामी करण्याचेच काम केले. मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून त्यांचे राजकारण संपवण्याचाही प्रयत्न केला आणि तेच नरेंद्र मोदी आज पवारां विषयी फार कळवळा असल्याचे दाखवून मगरीचे अश्रू ढाळत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
नेहरु,गांधी कुटुंबावर घराणेशाहीसह खोटे नाटे आरोप करून बदनामी करणे हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपचे एकमेव काम आहे.पंतप्रधान तेच पुढे घेऊन जात आहेत. उलट काँग्रेस पक्षात विविध जाती धर्मांच्या लोकांना संघटना व सत्तेत महत्वाची पदे दिली जातात.देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती,तसेच लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षाही काँग्रेसनेच दिलेल्या आहेत.पंतप्रधानपदाची संधी चालून आलेली असतानाही त्या सर्वोच्च पदाचा त्याग करून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी डॉ.मनमोहनसिंह यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी दिली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदांसह मुख्यमंत्रीपदावर दलित, वंचित, मुस्लीम समाजातील व्यक्तींना संधी काँग्रेसनेच दिलेली आहे.याउलट संघ आणि भाजपामध्ये ठराविक वर्गाच्या लोकांना पदे दिली जातात.काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मोदी यांनी भाजपातील घराणेशाहीचा अभ्यास करावा आणि मग बोलावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
शरद पवार हे आपले राजकीय गुरु आहेत असे नरेंद्र मोदी म्हणतात. तर दुसरीकडे त्याच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नॅशलिस्ट करप्ट पार्टी म्हणत ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करुन बदनामी करतात.यावरून पंतप्रधानांचे खायचे आणि दाखवायचे दात किती वेगळे आहेत हे दिसून येते असा टोलाही पटोले यांनी लगावला.
………………..(समाप्त)……….
Average Rating