मुंबई, दि.२ मुंबईतील मालवणी (मालाड पश्चिम) परिसरात अनधिकृतपणे राहणाऱ्या बांग्लादेशी घुसखोरांच्या बांधकामांवर कायदेशीर कारवाई करून ती पाडण्यात आली असल्याची माहिती, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शुक्रवारी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
या संबंधित कारवाई करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या सोबत पालकमंत्री लोढा यांनी एक बैठक आयोजित केली होती. त्यावेळी असा निर्णय घेण्यात आला होता की, उपनगरातील जी सरकारी जमीन आहे, अशा ठिकाणी जिथे अतिक्रमण झालेलं आहे, ती जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात येईल. त्यानुसार मालवणी परिसरातील अवैधपणे राहणाऱ्या बांग्लादेशी लोकांच्या घरांचे पाडकाम करण्यात आले आहे. ६ हजार मीटर जमीन या ठिकाणी अनधिकृत बांधकाम मुक्त करण्यात आली आहे. तसेच आता याठिकाणी देशी खेळांचे मैदान तयार करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी यावेळी दिली.
जे अनधिकृत कामे करतात, त्यांच्यासाठी सरकारचा बुलडोझर पॅटर्न आहे असा इशारा देतानाच,बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात विशेष करून ही कारवाई होत असून, सरकारी जमिनीवर अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई होणार असल्याचे परखड मतही लोढा यांनी यावेळी व्यक्त केले.
…………………………….(समाप्त)………..
Average Rating