मुंबई,दि.-शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतील फुटीमुळे काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद पटकावले.आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदही मिळविण्याचे प्रयत्न काँग्रेसच्या गोटातून दिल्ली दरबारी सुरु झाले आहेत. सध्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्याकडे असलेले हे पद काँग्रेसने आपल्याकडे घेतल्यास उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेते पद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी पक्षातील आमदारांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्रही पाठविल्याचे काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले
अर्थातच काँग्रेसच्या या मागणीनंतर महाविकास आघाडीत पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे असून याची तिन्ही पक्षांनाही पूर्वकल्पना आहे.शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर सभागृहातल्या संख्याबळाचे आकडे बदलले आहेत.विरोधी बाकांवर ज्या पक्षाचे संख्याबळ सर्वाधिक, त्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो.याच आधारे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली.
आता विधान परिषदेतही काँग्रेसचे संख्याबळ अधिक आहे.संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेण्यासाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविलेल्या पत्रावर विधानपरिषदेच्या ९ पैकी ६ आमदारांच्या सह्या आहेत.यात नागपूरचे ॲड. अभिजित वंजारी, प्रज्ञा सातव, वजाहत मिर्झा, राजेश राठोड, धीरज लींगाडे, सुधाकर अडबाले यांच्या स्वाक्षऱ्या असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
……………………….(समाप्त)………………
Average Rating