ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची माहिती
मुंबई, -या महिन्याच्या शेवटी ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची मुंबईतील ग्रँड हयात येथे तिसरी महत्वाची बैठक होणार असून या बैठकीला किमान पाच राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहू शकतात याशिवाय देशभरातील काही महत्त्वाचे नेते मुंबईत येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आम्ही राज्य सरकारची मदत घेणार आहोत. राज्य सरकारची मदत आम्हाला लागेल. आमचे काही नेते राज्य सरकारशी संवाद साधून नेत्यांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न मार्गी लावतील, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शनिवारी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
आज दुपारी वरळी येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार,शिवसेना उभाठाचे उद्धव ठाकरे,संजय राऊत,सुभाष देसाई काँग्रेसच्या वतीने अशोक चव्हाण,नाना पटोले,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते. बैठक संपन्न झाल्यानंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली.
दोन दिवसीय इंडिया आघाडीच्या या बैठकीस ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी एक डिनर आयोजित करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एक सप्टेंबर रोजी सकाळपासून दुपारपर्यंत एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. पाटणा, बेंगलोर आणि आता तिसरी बैठक मुंबईमध्ये होत असल्याने याच यजमानपद हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
बैठकीची जबाबदारी महाविकास आघाडीच्या विविध पक्षांना वाटून दिल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला देशभरातील महत्त्वाचे नेते येणारच आहेत यासोबतच पाच राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होणार असून आणि महाराष्ट्रात आमचे सरकार नसल्यामुळे आम्ही महाराष्ट्र सरकार सोबत चर्चा करणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.
…………………………….(समाप्त)……………….
Average Rating