उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई, -प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपनीची चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. तर यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी एन.डी स्टुडीओ ताब्यात घेऊन संवर्धन करण्याच्या दृष्टीने सर्व कायदेशीर बाबी तपासून पाहाण्यात येईल, असेही आश्वासन दिले.
भाजपच्या आशीष शेलार यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे नितीन देसाई यांच्या आत्महत्येचा मुद्दा मांडला. देसाई यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू एवढीच चौकशी न करता ही चौकशी अधिक व्यापक करण्याची मागणी त्यांनी केली. नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओवर १८० कोटींचे कर्ज काढले होते. या १८० कोटींचे २५२ कोटी झाले. या प्रकरणातून रशेष शाह नामक व्यक्ती आणि ‘एआरसी एडेलव्हाईस’ कंपनीच्या सावकारी पद्धतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे केवळ अपघाती मृत्यू म्हणून या प्रकरणाची चौकशी न करता या कंपनीच्या व्याजाचा दर, व्याज वृद्धीचा दर, वसूलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष पथक नेमून चौकशी करावी, अशी मागणीही शेलार यांनी केली. या कंपन्या आधुनिक सावकार असून त्यांची अन्य दोन प्रकरणाची माहिती आपल्याकडे असून तीही गृहमंत्र्यांकडे देणार असल्याचा इशाराही शेलार यांनी दिला.
काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य अशोक चव्हाण यांनी देसाई यांच्या कथित आर्थिक फसवणुकीची चौकशी सरकारने करावीच पण त्यांनी कर्जतजवळ उभा केलेला भव्यदिव्य स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा, अशी मागणी केली. यावर फडणवीस यांनी, देसाई यांनी आत्महत्या का केली याची चौकशी करताना त्यांची आर्थिकदृष्ट्या कोणी फसवणूक केली का, त्यातून त्यांना आत्महत्या करावी लागली का, याचीही चौकशी केली जाईल. स्टुडिओ ताब्यात घेण्यासंदर्भात कायदेशीर बाजू तपासून निर्णय घेतला जाईल, असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
…………………………….(समाप्त )………….
Average Rating